प्रस्तावना:
अथातो कालजिज्ञासा:-
‘काळ’ या विषयाचा विचार फार प्राचीन काळापासून विविध क्षेत्रांतील विद्वानांनी केला आहे. प्राचीन तत्त्ववेत्ते, धर्मपंडित यांपासून अर्वाचीन वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीने ‘काळ’ या विषयाबाबत मत प्रतिपादन केले आहे. त्यामध्ये काळाला ‘स्थूलरूप वस्तू’ प्रमाणे मानण्यापासून ‘मानवी मनाचा आभास’ इथपर्यंत सर्व प्रकारच्या कल्पना करून त्याचे विश्लेषण केले गेले आहे. यापैकी बहुतांश सर्वांचीच मते त्यांच्या त्यांच्या विषयाला अनुसरून योग्यच आहेत. तरीही आजपर्यंत ‘काळाची’ व्याख्या काही सिद्ध होऊ शकलेली नाही.
प्राचीन भारतीय प्रज्ञावंतांनी ‘काळा’चे केलेले विश्लेषण खूपच गहन, व्यापक आणि पूर्णत्वाकडे जाणारे आहे. विविध तत्त्वज्ञान, विचारप्रणालींमध्ये काळाच्या स्वरूपाबाबत तपशीलात काही मतांतरे असली तरी सर्व भारतीय विचारप्रणालींमध्ये काळाला ‘विश्वनिर्मितीचा आद्य स्पंद’ अशा दृष्टीनेच बघितले जाते. यामध्ये काळाचे अनादि-अनंत वैश्विक स्वरूप आणि मानवी बुद्धीला आकलनसुलभ खंडात्मक स्वरूप अशा दोन्ही बाजूने काळाचे विवेचन भारतीय साहित्यामध्ये विपुल आहे. काळाची व्यापकता, स्वरूप, क्रियाशीलता, गती, पुनरावर्तनशीलता या सर्व आयामांबाबत, विविध सिद्धांत या प्रज्ञावंतांनी प्रस्थापित केले आहेत.
सर्व सृष्ट पदार्थांच्या संरचनेमधील एक सामायिक निरीक्षण म्हणजे पदार्थाचा घनगोल आकार, त्याचे स्वत:भोवतीचे फिरणे आणि अन्य केंद्राभोवतीचे फिरणे (अणू रचनेपासून सूर्यमाला-आकाशगंगा, इ. पर्यंत) या मूलभूत निरीक्षणाच्या आधारेच काळाच्या गतीला ‘कालचक्र’ असे संबोधले गेले. सतत गतीमान असले तरी या मंडलाकार रचनेमुळेच त्याचे पुनरावर्तीत्त्व शक्य होते. हे चक्र अनादि काळ पासून चालू आहे आणि अनंत कालपर्यंत असेच चालू राहील. या पुनरावर्तनाच्या आभासामुळेच काळाला खंडस्वरूपात समजण्याची क्षमता मानवी बुद्धीला प्राप्त होते. मग या कालखंडांच्या आधारे कोणत्या काली, कोणत्या क्रमाने सर्व पदार्थांची उत्पती, गती आणि लय होतो याचे अवलोकन करणे शक्य होते. सृष्टीमध्ये एकामागोमाग एक घटना घडत जाते, वस्तू निर्माण किंवा नाश पावत जाते; या निरीक्षणाची चित्तामधली जी जाणीव तिला ‘कालसंवेदना’ असे म्हटले आहे.
मग सृष्टी निर्मितीचा पहिला क्षण कोणता, त्या क्षणापासून सर्व खगोलीय पदार्थ, सूर्यमाला, पृथ्वी, पृथ्वीवरील विविध द्रव्य, त्यांचे गुण, वनस्पती, सजीव प्राणी, इ. ची निर्मिती काय क्रमाने झाली, या निर्मितीमध्ये ‘काळा’चा संबंध किंवा प्रभाव काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न भारतीयांनी केला. आणि हा संबंध लक्ष्यात आल्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये या चराचर सृष्टीला एकसामायिक सूत्रामध्ये गुंफून प्रत्येक पदार्थाचे द्रव्याचे, जीवाचे या सृष्टीमधील स्थान आणि योगदान समजून घेणे शक्य झाले. हेच भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे शक्तीस्थान आहे. ‘काळा’बाबतच्या या प्रगल्भ जाणीवेमुळेच भारतीय ससंस्कृतीला ‘सनातन’ हे समर्पक, सयुक्तिक नामाभिदान प्राप्त झाले.
या सनातन विचारप्रणालीनुसार ‘कालबोध’ होण्यासाठी, त्याचा मानवी जीवनात उपयोग होण्यासाठी, कालगणनेला सुरुवात झाली. या कालगणनेचा आधार, संदर्भ म्हणजे पृथ्वीवरून दिसणारे खगोलीय तारकापुंज, चंद्र, सूर्य, इ. चे आकाशीय वृत्तामधून नियमिततेने होणारे भ्रमण. या नियमित घटनांच्या आवर्तनाला काही सुस्पष्ट संज्ञा आणि एकके निश्चित करण्यात आली. (वर्ष, ऋतु, मास, दिन, इ.) सृष्टीमधील प्रत्येक घटकाची उत्पत्ती, अस्तित्त्व आणि विलय हा काळाच्या आधारे कसा होतो, त्याच्या अस्तित्त्वावर काळाचा कसा प्रभाव होतो, इ. विशेष अभ्यास भारतियांनी केला. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या सर्व विद्या, कला, शास्त्र, सिद्धांत यांमध्ये विशेष साधर्म्य आहे. आणि प्रत्येक विद्याशाखेचे अंतीम लक्ष्य हे मानवाला परम ज्ञानापर्यंत पाहोचून ‘परमसत्याचा’ (ईश्वराचा) साक्षात्कार होणे, हेच आहे.
या सर्वात उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जे कर्म करायचे ते कालगतच असल्यामुळे प्रत्येक कर्मासाठी योग्यायोग्य ‘कालनिश्चिती’ करणे हाच ‘कालगणनेचा’ प्रमुख उद्देश. या कालगणनेच्या आधारेच अगदी दैनंदिन व्यक्तिगत कर्मापासून (उदा. अंघोळ, दात घासणे, इ.) एखाद्या अभिजात कलाविष्कारापर्यंत (नृत्य, नाट्य,इ.) किंवा विद्येमधील गूढार्थ बोधापर्यंत, अथवा तात्त्विक अनुसंधान व सिद्धांत प्रतिपादनापर्यंत सर्व विषयांमधील कालप्रभावाचे आकलन होते. या कालतत्त्वबोधानुसार सर्व विषयांची एकमेकांशी गुंफण होते आणि या सर्व मार्गांनी विशेष ‘कालबोध’ झाल्यामुळे ‘कालातीत परमसत्या’पर्यंत पोहोचणे शक्य होते. अशा व्यापक ‘कालविचारा’मुळेच भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या सर्व विद्या, कला, शास्त्र, सिद्धांत यांमध्ये विशेष साधर्म्य आहे. प्रत्येक विद्याशाखेचे अंतीम लक्ष्य हे मानवाला परम ज्ञानापर्यंत पाहोचवून ‘परमसत्याचा’ (ईश्वराचा) साक्षात्कार होणे, हेच आहे.
सृष्टीक्रमाचा आणि सर्व मानवी क्रीयाकलापाचा मूलाधार ‘काळ’ हाच आहे. अशा सर्वव्यापक काळाचे स्वरूप, गती, प्रभाव, इ. चे ज्ञान करून घेण्यासाठी कालसिद्धांत आणि कालगणनेचे शास्त्र तयार झाले, याचेच नाव ‘ज्योतिष शास्त्र’. हे सहा वेदांगांपैकी (कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद) एक आहे; म्हणजे वेदांमधील ज्ञानाचा प्रत्यक्ष बोध व अनुभव होण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता आहे.
या सर्व विवेचनाचा अर्थ असा की, आपल्या जीवनातील प्रत्येक गुण, कर्म, कौशल्य, बोध, इ. साठी कालज्ञान आवश्यक आहे. कालज्ञान, कालगणनेची पद्धत ही सृष्टी उत्पत्ती आणि गतीशी सुसंवादी असावी. अशी प्रत्यक्ष विहित कर्मापासून तत्त्वबोधापर्यंत सर्व पातळीवर मानवाला मार्गदर्शन करू शकणारी कालगणना पद्धती ‘पंचांग’ स्वरूपात हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीमध्ये चालू आहे. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग या पाच प्रमुख अंगांचा विशेषत्वाने निर्देश करणारे शास्त्र म्हणजे पंचांग. या पाच प्रमुख अंगांशिवायही असंख्य संदंर्भांचे कालनिर्देश या पंचांगाच्या आधारे केले जातात. सध्याही भारतातील विविध प्रांतांत तेथील स्थानिक पंचांगे उपलब्ध आहेत. परंतु त्याचा उपयोग आपण फक्त एखाद्या धार्मिक विधीचा मुहूर्त बघण्या पलिकडे करू शकत नाही. कारण त्यातील सर्व संकल्पना, संज्ञा यांचे अर्थ आणि उपयोग आपणच विस्मृतीत घालवले आहेत. या संज्ञा, संकल्पनांची आपल्याला पुन्हा ओळख व्हावी, ती वापरता यावी, सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी ‘कालायन’ हे भारतीय कालगणनेवर आधारित घड्याळ तयार केले आहे. लवकरच ते डिजिटल स्वरूपातही प्रत्यक्षात येणार आहे.
Comments
Post a Comment